Skip to main content

दुमालं

                           दुमालं

आज दहा वर्षे झालीयत त्या गोष्टीला पण माझ्या नकळत्यापणात झालेले व्यवहार आणि नैसर्गिक प्रकोप या गोष्टींची भिती आजही ठळकपणे आहे. २००८ च्या उतरा आणि हात्तीच्या अवकाळी पावसानं घराची पाठभिंत पाडली. मी नुकताच दहावीत जाणार होतो. वडिलांची तितकी मदत होत नव्हती. त्यांच्या दारुमुळं. आयनं गळ्यातला सर गहाण ठेवला आण भिताडाला पैसं उचाललं. हाय त्याच घराच्या तोड्या वापरून पांढऱ्या मातीत माचून घेतलं. शिमेटाचं करायला दातावर आमच्या तेवढं मास नव्हतं. घराला माळी असल्यानं घर उगाच मोठं वाटत होतं म्हणून चारी भिंती दोन दोन हात उतरून घेतल्या. नवीन बॅटन वापरून कवलं झाकून घेतली. कामापुरतं राह्याला झालं होतं म्हणून आय म्हणली दुमालं घालायला चार महिन्यानं बघूया. आता पैशी नाहीती तेवढं .घरबांधकामाच्या महिनाभराच्या जंजाळात बापानं चालता बोलता एका रात्री शेवटचा श्वास घेतला. रचलेल्या घराचं कोळसं झाल्यागत झालं. सारंच अडून बसलं व्हतं आता. रडून रडून आयच्या डोळ्याची कोरडी विहीर झाली होती. धीर सोडला हुता तीनं. बहिण तापानं फणफणत नुसती आबा आबा करत होती. मी परंपरेने मागितलेली दाढीडोई देऊन नुसताच थबकल्यागत बसायचो. किनाऱ्यापासून समुद्र ओहटून जावावा तसा बाप सोडून गेला. दहावीत सुरूवातीचं दोन महिनं शाळंचं तोंड बघितलं नाय. हळूहळू आबांचं नसणं स्विकारलं. सुकलेल्या केसांचा बुचडा बांधत , पातळाचा कासुटा घालत आयनं घरातला रांजण धुवून काढला. आडातनं आणलेली घागर त्यात रिकामी केली. आण लखन उठ म्हणत माझ्या गाल आत गेलेल्या चेहऱ्यावर ओल्या हातानं पुसून घेतलं. रोज आणत नसत्याती जेवण आपल्याला , तेवढंच चार दिवस आसत्याती म्हणून जड हातानं तीनं पोतेरा दिलेल्या चुलीत काटकं धुपवली. मुठभर गरा वैरून दिला मला आणि सोनीला. गरा नुसताच फिरायला लागला तोंडातनं . पुर्वेचा सूर्य पश्चिमेला जाऊन कधी अंधार झाला हे उघड्या डोळ्याला जाणवलं पण नाय. चुलीचा धूर कवलातून वर निघाला. वेदनेची एक गझल जळून खाक झाल्यागत.
     आता या आठ-दहा वर्षात पुलाखालून बरंच पाणी गेलं. आयनं नव्यानं संसार उभा केला. माझी पंधरावी झाली, सोनीचं लग्न झालं. घरात लाईट घेतली होती , टिव्ही घेतली. घरात आता शेळी होती , कोंबड्या होत्या, मांजर होतं. घराबाहेरच्या सपरीचं पत्रे मारून शेड केलं होतं. बरंच काही उलट सुलट क्रमानं चांगलं घडत आलं हुतं. पण दुर्दैवाने घराच्या भिंतीवर दुमालं घालायचं राहून गेलं होतं. तसं आयनं पण लय लक्ष घातलं नव्हतं आणि मी बाहेरगावी शिकायला असल्यानं मला ते लक्षात येत नव्हतं कधीच.
     आता गावी आलोय कामानिमित्त. उघडझाप करून पाऊस येत असल्यानं पेरणीला चांगलाच ओपसा घावला होता. गावाबरोबर आम्हीबी पेरलं. म्हाताऱ्या माणसांगत मला काय नक्षत्र कळत नायती. पण आता पावसाचा थेंब तुटेना झालता. सगळीकडेच पावसानं धुमाकूळ घातला होता. कोल्हापूरच्या पंचगंगेनं पाण्याची पातळी ओलांडली होती. मुंबईनं पण जीव नखात आणला होता लोकांचा. गडचिरोलीला सुध्दा पूर आणला आणि केरळची दुर्दशा ती याच पावसाने केली.
      एवढ्या असल्या पावसानं घराची पाठभिंत टेवलायला लागली. साईडच्या भितीसनीं दुमालं नसल्यानं पाऊस त्यात झिरपायला लागला. तसा सात आठ वर्षे त्या भिंतीनी पाऊस सोसला हुताच पण आता तसं बिलकुल वाटत नव्हतं. दिवाळीत घराचं काम काढायचंच आहे म्हणून आय शांत करायची मला. पण वेळ आपल्यासाठी थांबत नसते. रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने मला झोप लागत नव्हती. भिंत ओली व्हायची , पावसाच्या मधेच सोसाटणारा वारा भिंत पितेय का म्हणून भिती वाटायची.मला आक्रीत बघायची ताकद नव्हती आता. या भितीने इतका जागसूक राह्याचो. मनातल्या मनात म्हणायचो एवढा परतीचा सोस भिताडा. आवलगामी फटका नको हाणूस. चातकाचा आवाज कर्कश वाटू लागायचा. पाऊस पाणी ओतत राह्याचा. भिंतीवर उगवलेली झाडरं मुळं रोवून एटवान दाखवत होती. २००८ च्या पडझडती आठवल्या. मनाच्या पटलावर दुमालं नसल्यागत काळोख आत आत झिरपत राहीला.

लखन जोतिराम चौधरी

Comments